चिकन खाल्ल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होतो हे सिद्ध करा व ५१ हजार रुपये मिळावा, अशा आशयाचे फलक उदगीर शहरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी लावले आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे ग्राहकांनी चिकन व्यावसायिकांकडे पाठ फिरवल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी ही शक्कल लढवली आहे.
चिकन खाल्ल्याने कोरोना होतो ही अफवा संबंध महाराष्ट्रात पसरली. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
त्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांनाही बसला असून, ग्राहकांनी पाठ फिरवल्याने या व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर उदगीरच्या हॉटेल व्यावसायिकांनी नवीन शक्कल लढवून चिकन खाल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होतो हे सिद्ध करून दाखवा व ५१ हजार रुपये मिळवा असे आव्हानच त्यांनी ग्राहकांना दिले आहे. ग्राहकांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता चिकन खाण्यासाठी यावे असा यामागचा उद्देश आहे. हळूहळू पाठ फिरवलेल्या ग्राहकांना परत हॉटेलमध्ये आणण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची धडपड असून, बिघडलेली आर्थिक गणित सुधारण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.
या आवाहनाला स्वीकारून ग्राहकांनी जर चिकन खाण्यात पसंती दिली तर हॉटेल व्यावसायिकांबरोबरच पोल्ट्री व्यावसायिक ही आर्थिक अडचणीतून सावरणार आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून खड्डे करून कोंबड्या पुरण्याची वेळ व्यावसायिकांना आल्याने अफवेचा बळी कसा असतो याचे हे पोल्ट्री व्यावसायिक मूर्तिमंत उदाहरण ठरू शकतात.