कुक्कुट मांस व कुक्कूट उत्पादने पुर्णपणे सुरक्षीत – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

पुणे, दि.२१ (पीसीबी) – कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा ‘नोव्हेल करोना विषाणु’ प्रादुर्भावाशी कोणताही संबध नाही.  कुक्कुट मांस व कुक्कूट उत्पादने मानवीय आहारामध्ये वापरण्यासाठी पुर्णपणे सुरक्षीत असून, नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष्य करावे व याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा,असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. नोव्हेल करोना विषाणु’  बाबत समाज माध्यमातील अफवासंदर्भात आज पशुसंवर्धन आयुक्त सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. 

पशुसंवर्धन आयुक्त सिंह म्हणाले, महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देशात अग्रेसर आहे. सन २०१९ च्या २० व्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये एकूण कुक्कुट पक्षी संख्या  ७ कोटी ४२ लाख इतकी आहे. कुक्कट पक्ष्यांमध्ये होणारे विविध रोग व त्याचे नियंत्रण हा व्यवसायामधील यशस्वी होणेसाठीचा सर्वात महत्वाचा मुलमंत्र आहे. चीन या देशामध्ये आलेल्या ‘नोव्हेल करोना विषाणु’ प्रार्दुभावाच्या अनुषगांने गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमावर ( सोशल मेडीया – फेसबुक व व्हॉट्सअपद्वारे ) आपल्या देशात व राज्यात कुक्कुट मांस व इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय माहिती पसरविली जात आहे.

राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायाशी लाखो शेतकरी बांधवाचे चरितार्थ व हित निगडीत असल्याचे सांगून  सिंह म्हणाले,  मका व सोयाबीन उत्पादक शेतकरी विशेषत: कुक्कुटपालन उद्योगाशी संलग्न आहेत. तसेच कुक्कुट व्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडलेला आहे. ‘नोव्हेल करोना विषाणु’ हा सांसर्गिक असून, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संक्रमीत होतो. तथापि, कुक्कुट पक्ष्यांमधील करोना विषाणू (इन्फेक्शीअस ब्राँकायटीस) मानवामध्ये संक्रमीत होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये ‘नोव्हेल करोना विषाणु’ संक्रमीत झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटण उकळून – शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. ग्राहकांनी सोशल मेडीया – फेसबुक व व्हॉट्सअप इत्यादी माध्यमातील विपर्यास केलेल्या  माहिती, बातम्या, अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्याकडील कुक्कूट मांस व  कुक्कुट उत्पादने यांचा ‘नोव्हेल करोना विषाणु’ शी संबध नाही व ती आहारात वापरण्यासाठी पुर्णत: सुरक्षित असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले.  

यावेळी अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे, शास्त्रज्ञ डॉ.बी. एन.तांदळे, व्यवस्थापक डॉ. प्रसन्ना पेडगावकर, ससून रूग्णालयाचे डॉ. राजेश कार्यकर्ते आदी उपस्थित होते. 

Source: pcbtoday.in

Newsletter

Subscribe to our newsletter. Don’t miss any news or stories.

We do not spam!

Search