कोरोनाविरुद्ध लढताना शिजवलेला चिकनयुक्त आहार आवश्यक : डॉ. तात्याराव लहाने

पुणे, दि. ०४ : कोरोनासारख्या विषाणूजन्य आजारांशी लढताना प्रोटिन्सचे सेवन गरजेचे असते. चिकनमधून अव्वल प्रतिचे प्रोटिन्स मिळतात. म्हणून, कोरानाविरूद्धच्या लढाईत शिजवलेला चिकनयुक्त आहार घेतला पाहिजे, असे सुप्रसिद्ध डॉक्टर तात्याराव लहाने यांनी म्हटले आहे.

डॉ. लहाने राज्याच्या वैद्यकिय शिक्षण विभागाचे संचालक देखिल आहेत. फेब्रुवारीत कोरोनाच्या संसर्गाच्या बातम्या सुरू झाल्यानंतर काही घटकांनी सोशल माध्यमात चिकनबाबत गैरसमज निर्माण केले. एकूणच चिकनसंदर्भात उलटसूलट चर्चा सुरू झाली. पोल्ट्री उद्योगाची मोठी वाताहत झाली. या पार्श्वभूमीवर चिकनविषयक गैरसमजाबाबत विचारलेल्या प्रश्नावर डॉ. लहाने म्हणाले, “वटवाघूळाचे सूप घेतल्यानंतर कोरोनाचा माणसात शिरकाव झाल्याची थेअरी आहे. कोंबडी ही काही वटवाघळाच्या कॅटेगिरीत येत नाही. ५० डिग्रीच्यावर तापमान गेले तर त्यात विषाणू जीवंत राहत नाही. आपण (भारतीय) पूर्ण शिजवूनच चिकन किंवा मटण खातो. चांगले प्रोटिन्स आपल्याला चिकन, मटण आणि दूधातून मिळतात. जर आपण एकट्या दूधावरच अवलंबून राहिलो, तर पुरेसे प्रोटिन्स मिळणार नाहीत. कोरोनाशी लढायचे असेल तर चिकन खाल्ले पाहिजे.” कोरोनाविरोधात लढण्याच्या प्राधान्यक्रमात आहाराला महत्त्व आहे आणि आहारात प्रोटिन्सचे महत्त्व नाकारून चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी चिकनकडे पाठ न फिरवता व्यवस्थित शिजवून चिकन खावे, असे डॉ. लहाने यांनी सूचित केले.

सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. अतुल बिनिवाले यांनी देखिल आहारात प्रथिनांचे महत्त्व यावर एका इंग्रजी वृत्तवाहिनीत उद्बोधक माहिती दिलीय. डॉ. बिनिवाले सांगतात, “आपले शरीर आहारातून जे पोषक तत्त्वे घेते, त्यातून आपली इम्युन सिस्टिम राखली जाते. आपण कार्बोहायड्रेड घेतो, त्यातून केवळ कॅलरीज मिळतात. तथापि, प्रतिकार शक्ती राखण्यासाठी प्रोटिन्स अधिक उपयुक्त ठरतात. मानवी शरीराला दैनंदिन आहारात प्रत्येक किलोमागे एक ग्रॅम प्रोटिन्सची आवश्यकता असते. त्यानुसार तेवढे ग्रॅम प्रोटिन्स घ्यायला हवेत. शरीरात प्रोटिन्स साठवता येत नाही. त्यामुळे ते दररोज घेतले पाहिजे. शाकाहारात कडधान्ये, दूध, पनीर चिज, तर मांसाहारात चिकन, अंडी यांच्यातून प्रथिने मिळतात. त्यांचे योग्यप्रमाणात व संतुलित सेवन गरजेचे आहे. अशाप्रकारे आहाराबरोबरच योग्यप्रकारे व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे देखिल प्रतिकारशक्ती चांगली राहते.”

Source: sindhudurglive.com

Newsletter

Subscribe to our newsletter. Don’t miss any news or stories.

We do not spam!

Search